
ना तरी नगरांतरीं वसिजे | तरी नगरचि होईजे | तैसें व्यासोक्तितेजें | धवळत सकळ ||४१||
कीं प्रथम वयसाकाळीं | लावण्याची नव्हाळी | प्रकटे जैसी आगळी | अंगना अंगीं ||४२||
ना तरी उद्यानीं माधवी घडे | तेथ वनशोभेची खाणी उघडे | आदिलापासोनि अपाडें | जियापरी ||४३||
नाना घनीभूत सुवर्ण | जैसें न्याहाळिंता साधारण | मग अळंकारीं बरवेपण । निवाडुदावी ।।४४।।
तैसें व्यासोक्ती अळंकारिलें | आवडे ते बरवेपण पातलें | तें जाणोनि काय आश्रयिलें | इतिहासीं ||४५||